यावल। मित्रांसोबत सुरू असलेल्या पार्टीदरम्यान ताटातील घास उचलण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद इतका विकोपाला गेला की, तिघांनी मिळून आपल्या ४० वर्षीय मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील भालोद शिवारात घडली. दगडाने मारहाण केल्यानंतर तीक्ष्ण हत्याराने वार करून रमेश डोंगरसिंग भाबर (४०, रा. भालोद) यांचा खून करण्यात आल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात सूरज वासुदेव कोळी (२७), सूरज प्रमोद नेमाडे (३७) आणि अन्य एका संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पार्टीत किरकोळ कारणावरून वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री भालोद येथील एका वाड्यात रमेश भाबर यांच्यासह चार जण पार्टीसाठी जमले होते. पार्टी सुरू असताना ताटातील घास उचलण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले.
यावेळी संशयितांनी रमेश भाबर यांच्यावर दगडाने हल्ला केला. त्यानंतर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रमेश यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर संशयित पसार
हल्ल्यानंतर तिन्ही संशयित घटनास्थळावरून पसार झाले. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू केली. फैजपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक विनोद गाभणे, पोलिस उपनिरीक्षक संतोष चौधरी यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी पाहणी केली.
दोघे पोलिसांच्या ताब्यात
मृत रमेश भाबर यांचे भाऊ इंदसिंग भाबर यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे. खुनामागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण क्रम तपासातून स्पष्ट होणार आहे.















Discussion about this post