जळगाव । महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची तारीख आता जवळ आली आहे. उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य निवडणूक आयोगाने मतदारांची ओळख पटवण्यासाठी महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे.
अनेकदा मतदारांकडे अधिकृत निवडणूक ओळखपत्र (Voter ID) उपलब्ध नसते, अशा वेळी त्यांची गैरसोय टाळण्यासाठी 12 प्रकारचे पर्यायी ओळखपत्र पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत.
१५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र मतदाराने मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करावे. परंतु, ज्यांच्याकडे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र नसेल, अशा मतदारांना ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागेल
मतदार ओळखपत्र नसल्यास कोणते पुरावे धरले जाणार ग्राह्य?
- आधार ओळखपत्र
- पासपोर्ट
- वाहन चालविण्याचा परवाना
- पॅन कार्ड
- राष्ट्रीयीकृत बँका किंवा टपाल खात्यामधील खातेदाराचे छायाचित्र असलेले पासबुक
- सक्षम प्राधिकाऱ्याने छायाचित्रासह दिलेला दिव्यांग (अपंगत्वाचा) दाखला
- राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील छायाचित्र असलेले ओळखपत्र (मनरेगा जॉब कार्ड)
- निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा, अवलंबित व्यक्तींची फोटो असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे (उदा. पासबुक, प्रमाणपत्र इ.)
- लोकसभा, राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा, विधान परिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र
- स्वातंत्र्यसैनिकाचे छायाचित्र असलेले ओळखपत्र
- केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रासह कार्ड
- केंद्र शासन, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना छायाचित्रासह दिलेली ओळखपत्रे.















Discussion about this post