जळगाव : उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाही. राजकारणात काही होऊ शकतं. याचा अनुभव आम्ही 2019 व 2024 मध्ये घेतलेला आहे असं मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस म्हटलं असून यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला नवं उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे हे पुन्हा भाजपसोबत जातील या स्वरुपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता त्यांनी चक्क मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला दिला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, नरेंद्र मोदींचे सरकार यावे यासाठी आम्ही भाजपा सोबत उभे राहिलो आणि आहोत. याउलट अडचणीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची साथ सोडली. विचारधारा सोडून ते वागले याउलट आम्ही विचारधारेच्या बाजुने राहीलो. आता पुन्हा ते सोबत येण्याचा प्रयत्न करत असतील तर देवेंद्रजींनीही त्यावर विचार करावा, असा विनंती वजा सल्ला नामदार गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला आहे.
मोदीजींचं सरकार यावं यासाठी आम्ही तुमच्यासोबत आलो…याचा विचार देवेंद्र फडणवीस यांनी करावा. त्यांच्याकडे काहीच राहिले नाही म्हणून ते आता फडणवीस यांच्यासोबत गोड बोलत आहेत. मात्र ते कोणाचेच नाहीत याचा विचार देवेंद्र फडणवीस यांनी करावा असे गुलाबराव पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी गेल्या काही काळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना तू राहतो का मी राहतो असं आव्हान दिलं होतं. तेच उद्धव ठाकरे आज त्यांची पप्पी घेतायेत. स्वतःचे अस्तित्व टिकवण्याकरता उद्धव ठाकरे आता वाटेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यावेळेस कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की, विचारधारा सोडू नका त्याच वेळेस जर ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. त्यामुळेच आता ते काँग्रेससोबत फारकत घेत आहेत. राष्ट्रवादीमध्ये तर नेतृत्व बदलण्याच्या गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे त्यांची महाविकास आघाडी टिकणार नाही. ज्यांनी भगवा सोडला त्यांनी पुन्हा भगवा पकडला की हात थरथरतात हे आता त्यांच्या लक्षात आल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.
Discussion about this post