चोपडा । जळगाव जिल्ह्यात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर शस्त्रांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली असून, चोपडा तालुक्यातून दोन तरुणांना गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसांसह रंगेहात अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, उमर्टीकडून कृष्णापूर ते मामलदे मार्गे चोपड्याकडे दोन तरुण मोटारसायकलने गावठी पिस्तूल घेऊन येत आहेत. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने सापळा रचून काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर (MH-19-S-9450) ही मोटारसायकल अडवली. तपासणीदरम्यान दोघांच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, ५ जिवंत काडतुसे, मोटारसायकल आणि २ मोबाईल फोन असा एकूण ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे राहुल कुवरसिंग पावरा (वय २२, रा. उमर्टी, ता. चोपडा) आणि गणपत प्रभाकर कीर्तने (वय २८, रा. असोला जवळ बाजार, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) अशी आहेत. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.















Discussion about this post