पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्या ऐतिहासिक प्रकल्पाचे उद्घाटन होणार होते, त्याच रिफायनरी प्रकल्पात उद्घाटनाच्या अवघ्या २४ तास आधी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील बाळोतरा जिल्ह्यातील पचपद्रा येथील रिफायनरी संकुलात आज सोमवारी सकाळी आग लागली. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की, कित्येक किलोमीटर अंतरावरून आकाशात धुराचे काळे लोट स्पष्ट दिसत होते.
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भव्य रिफायनरीचे लोकार्पण होणार होते. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याने प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा प्रकल्प ‘हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ (HPCL) आणि राजस्थान सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे. ९ दशलक्ष मेट्रिक टन प्रति वर्ष (MMTPA) क्षमतेचा हा प्रकल्प भारताची ऊर्जा सुरक्षा आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रातील आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सुमारे ७९,४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असलेला हा संकुल अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की अन्य काही तांत्रिक बिघाडामुळे, याचा तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे उद्या होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यावर अनिश्चिततेचे सावट पसरले असून, नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही.















Discussion about this post