बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात मान्सूनचे वारे पूर्णपणे सक्रिय झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. ६ जुलै नंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे. मागील काही तासांपासून मुंबई आणि पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. पुढील ३ दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
हवामान विभागाचे अधिकारी एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या घाटमाथा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसासाठी पूरक परिस्थिती असून, राज्याच्या इतर भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वर येथे झाली आहे.
मुंबई आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मान्सूनचे वारे वेगाने वाहत असल्याने पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत सध्या आहे तशीच पावसाची स्थिती कायम राहणार आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरील जिल्ह्यांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ६ जुलैनंतर मात्र पावसाची तीव्रता कमी होणार असल्याने त्यानंतर नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आज आणि उद्या ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट:
आजचा इशारा: रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी आज ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टीच्या भागात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
उद्याचा इशारा (४ जुलै): उद्या पालघर, ठाणे, रायगड, पुण्याचा घाटमाथा आणि सातारा या भागांसाठी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून, नागरिकांना आणि पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगावला येलो अलर्ट
दरम्यान, हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यापूर्वीही सलग दोन दिवस अलर्ट देण्यात आला होता. मात्र, अपेक्षेप्रमाणे मुसळधार पाऊस झाला नसून जिल्ह्यात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.आज सकाळपासून अधून मधून जळगाव शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून वातावरण ढगाळ झाले आहे. पावसाळी वातावरणामुळे दिवसभर कमाल तापमानात घट झाली आहे.















Discussion about this post