मुंबई । बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या तीनही शूटरांना राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोटा पोलिसांनी रेल्वे परिसरात ही कारवाई केली. तिन्ही आरोपी ट्रेनने प्रवास करत असताना पोलिसांच्या हाती लागले. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघे हरियाणाचे, तर एक महाराष्ट्रातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केल्यानंतर आरोपी मुंबईतून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. ते मुंबईहून दिल्लीच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी ट्रेन क्रमांक १२९३९ पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. ही गाडी कोटा येथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कोटा पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. रेल्वे परिसरात त्यांना पकडण्यात आले. या प्रकरणात यापूर्वी कोट्यातील रेल्वे कॉलनी परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचीही माहिती समोर आली होती. हे संशयित गोळीबार प्रकरणातील आरोपींचे जुने साथीदार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
दोन आरोपी हरियाणाचे, एक महाराष्ट्राचा
अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी दोघे हरियाणातील, तर एक महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. आता पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जाणार असून, गोळीबारामागील नेमके कारण, कटात सहभागी असलेल्या इतर व्यक्ती आणि आरोपींच्या पळून जाण्याच्या प्रयत्नांबाबत माहिती मिळवण्याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणात अनिल पंडित नावाच्या आरोपीच्या साथीदारांचाही उल्लेख समोर आल्याचे वृत्त आहे. मात्र, गोळीबारामागील संपूर्ण कट आणि इतर संशयितांची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे.















Discussion about this post