जळगाव । जळगावातील शाहू कॉम्प्लेक्स मध्ये खिशातून झालेल्या रोकड चोरीच्या घटनेचा जळगाव शहर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत पर्दाफाश केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १२ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात एका विधी संघर्षित बालकाचाही सहभाग आढळून आला आहे.
याबाबत असे की, २६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास शाहूनगर येथील शाहरू कॉम्प्लेक्समध्ये अनिल राजमल कासट (वय ६२) यांच्या पॅन्टच्या खिशातून १२ हजार ५०० रुपयांची रोकड चोरीला गेली. काही वेळातच चोरीची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
घटना गंभीर असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.चोरी करणाऱ्या व्यक्तींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून मिळालेल्या माहितीची तांत्रिक पद्धतीने पडताळणी करण्यात आली. त्याचवेळी पोलिसांच्या गुप्त बातमीदारांकडूनही संशयितांबाबत माहिती मिळविण्यात आली.
तपासाची दिशा स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी गेंदालाल मिल परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी शहीदखान नजीरखान (वय २७) आणि समीर खान मजीदखान (वय ३७) हे दोघे तसेच एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले.संशयितांची चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर चोरीच्या घटनेत सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर दोन्ही प्रौढ आरोपींना अटक करण्यात आली, तर विधी संघर्षित बालकास कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी १२ हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासांत आरोपींचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.














Discussion about this post