रंगकर्मींकडून आधुनिक नाट्यगृहाची मागणी; नटराज पूजन, नांदी गायन आणि नाटिका सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत
जळगाव : शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे मराठी रंगभूमी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त रंगभूमीवरील साहित्याचे पूजन, नटराज मूर्तीची पूजा, पारंपरिक नांदी गायन आणि नाटिका सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन सर्व रंगकर्मींच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांनी दिली. तसेच नूतनीकरणानंतर नाट्यगृहाचे भाडे सर्वसामान्य रंगकर्मींना परवडणारे राहील, असे आश्वासन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, आमदार सुरेश ऊर्फ राजू मामा भोळे, नगरसेवक विष्णू भंगाळे, नगरसेवक हर्षल मावळे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सदस्या व नियामक मंडळ सदस्या गीतांजली मीरा प्रल्हाद ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते रंगमंच, वाद्ये, नाट्यसंहिता, रंगपेटी आणि नटराज मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे भारतमातेची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ‘पंचतुंड नररुंडमालधर…’ या पारंपरिक नांदीचे गायन दुष्यंत जोशी, यश देशपांडे, खुशी बागूल आणि प्रणाली बाविस्कर यांनी केले. त्यांना तबल्यावर दर्शन गुजराथी यांनी साथसंगत केली. उपस्थित मान्यवरांनीही नांदी गायनात सहभाग घेतला.
नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी रंगकर्मींच्या विविध मागण्या
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गीतांजली ठाकरे यांनी रंगभूमीच्या विकासासाठी आवश्यक सुविधांचा मुद्दा उपस्थित केला. जिल्हा नियोजन समितीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी असलेल्या दोन टक्के निधीतून बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रंगकर्मींच्या वतीने करण्यात आली.
बालगंधर्व नाट्यगृहाचे नूतनीकरण करताना सर्वांत खालच्या मजल्यावर वाहनतळ, त्यावरील मजल्यावर व्यावसायिक दुकाने आणि सर्वांत वरच्या मजल्यावर अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नाट्यगृह उभारण्यात यावे, अशी संकल्पना लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आली. याशिवाय कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात थिएटर आणि सिनेमागृह यांची एकत्रित उभारणी करण्यात यावी, अशी मागणीही गीतांजली ठाकरे यांनी केली.
बालगंधर्व नाट्यगृहासाठी २.५ कोटींचा निधी मंजूर
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून बालगंधर्व खुले नाट्यगृहासाठी विशेष २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. या निधीमुळे नाट्यगृहाच्या नूतनीकरणाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी रंगकर्मींच्या मागण्यांची दखल घेत नूतनीकरणानंतर बालगंधर्व नाट्यगृहाचे भाडे सर्वांना परवडणारे राहील, असे आश्वासन दिले. महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक विष्णू भंगाळे आणि नगरसेवक हर्षल मावळे यांनी उपस्थित रंगकर्मींना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
‘गाईड’ नाटिकेचे सादरीकरण; शरद पांडे यांचे पद्यगायन
कार्यक्रमात लेखक व दिग्दर्शक अमोल ठाकूर यांच्या ‘गाईड’ या छोटेखानी नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. तसेच शरद पांडे यांनी पद्यगायन करून कार्यक्रमात रंगत आणली. रंगभूमीशी नाते जपणाऱ्या ज्येष्ठ आणि नवोदित कलाकारांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले.
या कार्यक्रमाला चिंतामण पाटील, दुष्यंत जोशी, पियूष रावळ, चंद्रकांत चौधरी, नितीन देशमुख,दीपक चांदोरकर, दीपक भट, रमेश भोळे, प्रदीप भोई, महेंद्र खेडकर, चंद्रकांत पाटील, सुरेश राजपूत, ओमप्रकाश शर्मा, अरविंद देशपांडे, अनिल मोरे, गौरव लवंगे, आकाश बाविस्कर, पवन खंबायत, जगदीश नेवे, सुभाष मराठे, विजय पाठक, संजय निकुंभ, राजेंद्र देशमुख, रमाकांत भालेराव, अशोक जोशी, राजेश पाटील, जय सोनार यांच्यासह अनेक ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाट्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या रांगोळी सजावटीसाठी कुमुद नारखेडे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन तुषार वाघुळदे आणि प्रा. राजेंद्र देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन आकाश बाविस्कर यांनी केले. बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाल्याच्या घोषणेमुळे जळगावच्या रंगभूमीला नवसंजीवनी मिळण्याची आशा या निमित्ताने व्यक्त करण्यात आली.















Discussion about this post