जळगाव । जळगाव रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा असलेला खान्देश सेंट्रल मॉलकडील रस्ता अचानक बंद करण्यात आल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता हा मार्ग बंद केल्याने ऐनवेळी स्थानकावर पोहोचणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक वर्षांपासून नागरिकांकडून वापरल्या जाणाऱ्या या रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
खान्देश सेंट्रल मॉलच्या बाजूने रेल्वे स्थानकाकडे जाणारा हा मार्ग प्रवाशांसाठी सोयीचा मानला जातो. दररोज अनेक नागरिक आणि रेल्वे प्रवासी या रस्त्याचा वापर करतात. मात्र, अचानक रस्ता बंद झाल्याने नेहमीच्या मार्गाने स्थानकाकडे जाणाऱ्यांना माघारी फिरावे लागत आहे. काही प्रवाशांना पर्यायी मार्गाने जावे लागत असून, त्यामुळे त्यांचा वेळही वाया जात आहे.
विशेषतः रेल्वे सुटण्याच्या वेळेत स्थानकावर पोहोचण्याची घाई असलेल्या प्रवाशांना या निर्णयाचा फटका बसत आहे. पूर्वसूचना किंवा पर्यायी मार्गाबाबत स्पष्ट माहिती नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून वापरात असलेला रस्ता अचानक बंद करण्यामागचे नेमके कारण काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रेल्वे प्रशासनाने रस्ता बंद करण्यापूर्वी नागरिकांना विश्वासात का घेतले नाही, अशी नाराजीही व्यक्त केली जात आहे.
रस्ता किती दिवस बंद राहणार, पर्यायी व्यवस्था काय?
रस्ता बंद करण्याचा निर्णय तात्पुरता आहे की कायमस्वरूपी, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तसेच प्रवाशांना स्थानकावर जाण्यासाठी कोणता पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे, याचीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने याबाबत स्पष्टीकरण देऊन प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.















Discussion about this post