मुंबई । आगामी विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला जागेचा तिढा अखेर सुटल्याची माहिती समोर आली आहे. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे. या जागेवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत होता. मात्र चर्चेनंतर भाजपला ही जागा देण्यावर एकमत झाल्याचे वृत्त आहे.

या निर्णयानंतर आता भाजपकडून पुणे शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवाराची निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे संभाव्य उमेदवारांची नावे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

भाजप महायुतीत ज्या ३ जागांवर निवडणूक लढवणार आहे, त्या प्रत्येक जागेसाठी ५ अशा एकूण १५ नावांचा पर्याय वरिष्ठ नेतृत्वाकडे सोपवण्यात आला आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून अंतिम नावावर निर्णय घेतला जाणार आहे.
महायुतीचा असा आहे जागावाटपाचा फॉर्म्युला:
भाजप: पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि नागपूर पदवीधर.
शिवसेना (शिंदे गट): अमरावती मतदारसंघ.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ.
दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार दावा ठोकला होता. मात्र, दीर्घ चर्चेअंती ही जागा भाजपला देण्यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले. आता या जागेवर दावा सांगणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज इच्छुकांची वरिष्ठ नेत्यांकडून समजूत काढली जाणार आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजप प्रदेशाध्यक्षांनी पाठवलेल्या संभाव्य नावांवर केंद्रीय नेतृत्व लवकरच शिक्कामोर्तब करणार असून, आगामी दोन दिवसांत अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post