नवी दिल्ली । भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल झाल्यानंतर आता केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळातही व्यापक फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजधानी दिल्लीत सध्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असून, या विस्तारात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी नव्या चेहऱ्यांना केंद्रात स्थान देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
आगामी 2027 मधील विधानसभा निवडणुका आणि 2029 ची लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात बदल केले जाण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्तर प्रदेश आणि पंजाबसह निवडणूक होणाऱ्या राज्यांना या फेरबदलात अधिक प्रतिनिधित्व मिळू शकते. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यात बदल होण्याची चर्चा असून, त्यांच्याकडील विद्यमान खाते काढून त्यांना दुसरे मंत्रालय सोपवले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
16 ते 17 नव्या चेहऱ्यांना संधी?
संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात तब्बल 16 ते 17 नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे सध्या मंत्रिमंडळात असलेल्या काही ज्येष्ठ नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्या मंत्र्यांचा समावेश होईल किंवा कोणाला वगळले जाईल, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून खासदारांशी संवाद वाढवला आहे. काही खासदारांसोबत चाय पे चर्चा सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नव्या मंत्र्यांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अनेक मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांचा भार
केंद्रातील काही मंत्र्यांकडे सध्या एकापेक्षा अधिक मंत्रालयांचा अतिरिक्त कार्यभार आहे. 14 केंद्रीय मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त मंत्रालयांची जबाबदारी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या खात्यांची विभागणी करून नव्या नेत्यांना संधी देण्याची शक्यता आहे. दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे आहे. आगामी विस्तारात त्यांच्या जबाबदारीतही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्रिमंडळात 12 जागा रिक्त
केंद्राच्या मंत्रिमंडळात एकूण 81 सदस्यांपर्यंत मंत्री असू शकतात. सध्या मोदी सरकारमध्ये 69 मंत्री असून, त्यामुळे आणखी 12 मंत्रिपदे भरण्याची शक्यता आहे. या रिक्त जागांसह काही विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल करून सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विस्तार?
मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार, जन्माष्टमीच्या आसपासही विस्तार होऊ शकतो. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर निवडणूक होणाऱ्या राज्यांना या विस्तारात प्रतिनिधित्व देण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र मंत्रिमंडळात नेमके कोणते चेहरे येणार आणि कोणत्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होणार, याचे चित्र अधिकृत निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.















Discussion about this post