चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड गावाजवळ भीषण अपघात झाला. भरधाव कारने रस्त्याने जाणाऱ्या तीन महिलांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिला रस्त्याने जात असताना भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर मृत महिला कारमध्ये अडकून पडल्याची माहिती आहे. तर गंभीर जखमी झालेल्या दोन्ही महिलांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले .
संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
या भीषण अपघातानंतर बिलाखेड येथील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. अपघातप्रवण ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत, सुरक्षा फलक लावावेत आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत ग्रामस्थांनी चाळीसगाव-मालेगाव मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आणि वाहनांच्या रांगा लागल्या. परिस्थितीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.















Discussion about this post