दिवाळीचा सण जवळ येत असताना साखरेच्या दराबाबत चिंता वाढू लागली आहे. खुल्या बाजारात साखरेचा दर सध्या ८० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याची माहिती असून, आगामी सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यास साखरेचे दर १०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साखरेची साठेबाजी आणि कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी प्रशासनाकडून व्यापाऱ्यांच्या साठ्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
राज्यात दर महिन्याला सरासरी ३ लाख टन साखरेची गरज भासते. साखर विभागाच्या माहितीनुसार, सध्या राज्यात सुमारे १७ ते १८ लाख टन साखरेचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे तातडीने साखरेची कमतरता नसली तरी आगामी सणासुदीतील वाढती मागणी, तसेच महाराष्ट्रातून इतर राज्यांना होणारा साखरेचा पुरवठा यामुळे बाजारातील दरांवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
दिवाळीत मागणी वाढणार
दिवाळीच्या काळात मिठाई, फराळ आणि विविध खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून साखरेचा अनावश्यक साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाणार नाही, यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.महाराष्ट्रातून दक्षिण भारतातील काही राज्यांनाही मोठ्या प्रमाणावर साखरेचा पुरवठा केला जातो. त्यामुळे राज्यातील उपलब्ध साठ्यावर अतिरिक्त दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम किरकोळ बाजारातील साखरेच्या दरावर होऊ शकतो.
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीत साठा मर्यादेबाबत निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार व्यापाऱ्यांना एका ठिकाणी एकावेळी ४०० टनांपेक्षा अधिक साखर साठवता येणार नाही. तसेच साखर खरेदी केल्यानंतर ती ३० दिवसांपेक्षा अधिक काळ साठवून ठेवण्यावरही निर्बंध आहेत.या नियमांमुळे व्यापाऱ्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून साखरेचे दर वाढवण्याला आळा बसण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून साठ्याची तपासणी आणि बाजारातील दरांवर लक्ष ठेवले जात आहे.
राज्यासाठी अतिरिक्त कोट्याची मागणी
दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्याला अतिरिक्त साखर कोटा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात मागणी वाढली तरी बाजारात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
१५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम
साखर संचालक डॉ. केदारी जाधव यांच्या माहितीनुसार, सध्या राज्यात १७ ते १८ लाख टन साखरेचा साठा उपलब्ध आहे. तसेच १५ ऑक्टोबरपासून साखर गाळप हंगाम सुरू होणार असल्याने पुढील काळात नव्या साखरेचा पुरवठा बाजारात सुरू होईल. त्यामुळे सध्या राज्यात साखरेची तातडीची कमतरता नसली तरी दिवाळीतील वाढती मागणी आणि साठेबाजीवर प्रशासनाला विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरवठा सुरळीत ठेवण्याबरोबरच व्यापाऱ्यांकडील साठ्यावरही कठोर नजर ठेवली जाणार आहे.















Discussion about this post