अमरावती । अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत उपचार घेत असलेल्या तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने अमरावतीसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, मृत बालकांच्या आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर नवजात शिशु अतिदक्षता विभाग (SNCU) आहे. येथे कमी दिवसांचे, कमी वजनाचे तसेच गंभीर अवस्थेतील नवजात बालकांवर उपचार सुरू होते. सोमवारी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास या विभागात अचानक आग लागली.
प्राथमिक माहितीनुसार, व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्याचे लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि विभागातील इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केली.
३९ बालकांवर उपचार सुरू होते
आगीच्या वेळी नवजात शिशु अतिदक्षता विभागात तब्बल ३९ बालकांवर उपचार सुरू होते. कर्मचाऱ्यांनी तत्परतेने इतर बालकांना सुरक्षित ठिकाणी हलविले. काही बालकांना पुढील उपचारांसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यापैकी चार बालकांवर उपचार सुरू असून, एका बालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
मात्र, या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाळाला उपचार मिळतील आणि त्याची प्रकृती सुधारेल, या आशेने रुग्णालयात दाखल केलेल्या पालकांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेनंतर मृत बालकांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रुग्णालयातील फायर अलार्म यंत्रणा कार्यरत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. आगीची माहिती वेळीच मिळाली असती तर दुर्घटनेची तीव्रता कमी करता आली असती का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, आगीचे नेमके कारण, रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्था आणि संबंधित यंत्रणा कार्यरत होती की नाही, याबाबत प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केले असून, घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश दिले आहेत.















Discussion about this post