सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सणासुदीचा काळ नसतानाही बाजारात साखरेचे दर सातत्याने वाढत आहेत. देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये साखरेचा किरकोळ भाव प्रतिकिलो ६० ते ७० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या गृहिणींच्या स्वयंपाकघरातील बजेटवर अतिरिक्त भार पडत आहे.
विशेष म्हणजे, साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असतानाही किमती कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या वर्षभरातील आकडेवारीवर नजर टाकली तर साखरेच्या किमतीत सुमारे ३० टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नव्हे तर गेल्या एका महिन्यातच साखरेचे दर सुमारे ५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे साखर खरेदीसाठी ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
सरकारचे निर्णयही ठरताहेत निष्प्रभ?
साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि बाजारातील पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बाजारात साखरेची कमतरता भासू नये, यासाठी सरकारने अडीच लाख टन साखर आयातीचा कोटा दुसऱ्यांदा जारी केला आहे. याशिवाय चालू महिन्यात साखर कारखान्यांना त्यांच्या कोट्यापैकी ९० टक्के साखर विक्री करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.दुसरीकडे, यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांनी उत्पादन प्रक्रियेलाही वेग दिला आहे. बाजारात साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाही किरकोळ बाजारात दर कमी होत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणाम
देशांतर्गत पातळीवर साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचाही स्थानिक किमतींवर परिणाम होत आहे. जागतिक बाजारात साखरेच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवर होत असल्याचे सांगितले जात आहे.एकीकडे आयातीचा कोटा आणि साखर कारखान्यांकडून वाढते उत्पादन यामुळे पुरवठा सुधारण्याची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे दरांवर दबाव कायम आहे. त्यामुळे साखर लगेच स्वस्त होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.
गृहिणींचे बजेट आणखी बिघडणार?
साखर ही प्रत्येक घरातील दैनंदिन गरजेची वस्तू आहे. चहा, नाश्ता, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये तिचा वापर होत असल्याने दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबांच्या खर्चावर होतो. आधीच खाद्यतेल, डाळी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढलेल्या असताना साखरेच्या दरवाढीमुळे घरखर्चाचे गणित आणखी बिघडण्याची शक्यता आहे. आता सरकारच्या उपाययोजनांचा बाजारावर किती परिणाम होतो आणि साखरेचे दर कधी कमी होतात, याकडे सर्वसामान्य ग्राहकांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post