भुसावळ : दिल्लीहून त्रिचूर येथे शैक्षणिक सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासादरम्यान अचानक उलट्या आणि मळमळ होण्याचा प्रकार समोर आला. हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या सुमारे २५ ते ३० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली. यातील पाच विद्यार्थ्यांची प्रकृती तुलनेने अधिक बिघडली होती. दरम्यान, भुसावळ स्थानकावर रेल्वे प्रशासनाने तातडीने वैद्यकीय पथक तैनात करून सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली.
दिल्लीहून त्रिचूरकडे जाणाऱ्या या शैक्षणिक सहलीत एकूण ९३ विद्यार्थी आणि १२ शिक्षक सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांनी भोपाल रेल्वे स्थानकावर जेवण केल्यानंतर काही वेळातच काही विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवू लागला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाला याची कल्पना देण्यात आली.
यानंतर खंडवा रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या मेडिकल आणि कमर्शियल टीमसह अधिकारी दाखल झाले. अस्वस्थ विद्यार्थ्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना आवश्यक औषधे देण्यात आली. प्रकृतीत सुधारणा न झाल्यास खंडवा स्थानकावर उतरून पुढील उपचार घेण्याचा सल्लाही रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला.
दरम्यान, मंगला एक्सप्रेस रात्री भुसावळ रेल्वे स्थानकावर दाखल होताच भुसावळ रेल्वे विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून विशेष वैद्यकीय व्यवस्था केली. स्थानकावर डॉक्टर, नर्स, रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले होते. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली.
गाडी भुसावळ स्थानकावर पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्रास होत असलेल्या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांचीही तपासणी केली. वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यासाठी मंगला एक्सप्रेस सुमारे पाऊण तास भुसावळ स्थानकावर थांबवण्यात आली. तपासणीनंतर विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी भोपाल स्थानकावर जेवण केल्यानंतरच त्रास सुरू झाल्याने जेवणातून विषबाधा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. खबरदारी म्हणून काही डॉक्टरांना विद्यार्थ्यांसोबत पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.















Discussion about this post