मुंबई । राज्यातील उच्च शिक्षणाबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ७ आदर्श महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रश्न आता मार्गी लागला असून, त्यांना University Grants Commission (UGC) स्केलनुसार वेतन देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे या महाविद्यालयांतील शिक्षक आणि सहायक प्राध्यापकांना आता केवळ मूळ वेतनच नव्हे, तर महागाई भत्ता (DA) आणि इतर सर्व भत्ते यूजीसीच्या निकषांनुसार मिळणार आहेत. यामुळे संबंधित शिक्षकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, त्यांच्या वेतनातील तफावत दूर होणार आहे.
या सात आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांना मिळणार दिलासा?
जालना जिल्ह्यात घनसांवगी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संलग्न), बुलढाणा (संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती), रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन, हिंगोली, गडचिरोली (गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली), रत्नागिरी जिल्ह्यात आंबवडे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळेरे येथे अशी सात आदर्श महाविद्यालये कार्यरत आहेत.
या निर्णयामुळे सात आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांना सहायक प्राध्यापक पदावरील युजीसी स्केलनुसार मूळ वेतन, महागाई भत्ता आणि इतर भत्ते मिळतील. केवळ वेतनातच वाढ झाली नसून, या प्राध्यापकांच्या अनुभवाचा विचार करून सरकारने आणखी एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. भविष्यात होणाऱ्या अधिकृत पदभरती प्रक्रियेमध्ये या प्राध्यापकांना १० अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत.















Discussion about this post