मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणाऱ्या कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ केले जाणार आहे. या कर्जमाफीसाठी सरकारवर सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे या निर्णयाची अधिकृत घोषणा आणि शासन निर्णय सध्या जारी करण्यात येणार नसला, तरी आचारसंहिता संपल्यानंतर सरकारकडून यासंदर्भातील अध्यादेश काढला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील ६५ लाखांहून अधिक कर्जखात्यांचा या योजनेत समावेश होणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’
सरकारने या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या कर्जांना या योजनेअंतर्गत पात्रता मिळणार असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्याचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही लाभ
केवळ थकीत कर्जदारच नव्हे, तर नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे. अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीबाबत निर्णय होणार असल्याचे संकेत दिले होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशांमुळे सध्या अधिकृत घोषणा टाळण्यात आली असली तरी निर्णयाला मंजुरी मिळाल्याने राज्यातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मान्सूनच्या तोंडावर आलेल्या या निर्णयामुळे शेतीसाठी भांडवल उभे करण्यास मदत होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post