जळगाव । केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क रद्द करण्याचा घेतलेला निर्णय आणि सतत होणारी इंधन दरवाढ यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. “आपल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढून बाहेरच्या शेतकऱ्यांसाठी जेवणाच्या पंगती बसवायची अक्कल सरकारला कोणी दिली कुणास ठाऊक?” असा संतप्त सवाल त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे उपस्थित केला आहे.
रोहिणी खडसे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले आहे की, “केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क अचानक रद्द केले आहे. सरकार झोपेत निर्णय घेत आहे का? असा प्रश्न आम्हाला पडत आहे.” सरकारच्या या एका निर्णयामुळे देशांतर्गत कापूस बाजाराला मोठा फटका बसला असून कापसाच्या दरात तब्बल १००० ते १५०० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
देशाच्या सद्यस्थितीवर बोट ठेवत त्यांनी पुढे लिहिले, “एकीकडे देशाचे प्रमुख स्वतः सांगतात की देशासमोर मोठे आर्थिक संकट येणार आहे आणि दुसरीकडे याच संकटाच्या काळात देशातील मुख्य कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आणखी अडचणीत ढकलण्याचे काम सरकारकडून केले जात आहे.”
कापसाच्या मुद्द्यासोबतच रोहिणी खडसे यांनी वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरूनही सरकारला धारेवर धरले. “सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असताना देखील देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसाआड वाढत आहेत. सरकार पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट (VAT), सरचार्ज आणि इतर कर रद्द करून सामान्य जनतेला मोठा दिलासा देऊ शकते, पण सरकारला ही बुद्धी सुचत नाही. सरकारला सुचतंय काय? तर बाहेरून येणाऱ्या कापसाचे आयात शुल्क रद्द करायचं!” अशा शब्दांत त्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ऐन शेतीच्या हंगामात कापसाचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, रोहिणी खडसे यांच्या या राजकीय पवित्र्यामुळे आता कापूस उत्पादक पट्ट्यात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.















Discussion about this post