बुलढाणा । आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा मोठ्या वादात अडकले आहेत. कोल्हापूरचे कॉम्रेड आणि प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गायकवाड यांच्यावर होत आहे. या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
वादाचे नेमके कारण काय?
बुलढाण्यातील एका विवाह सोहळ्यात प्रशांत आंबी यांनी प्रा. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे वाटप केले होते. हे पुस्तक आमदार गायकवाड यांच्या पत्नीलाही देण्यात आले. या पुस्तकातील मजकूर आणि शीर्षकावरून आमदार गायकवाड संतापले. “छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून इतिहासाची छेडछाड केली आहे,” असा दावा करत गायकवाड यांनी आंबी यांना फोन करून जाब विचारला.
“पानसरेंचे काय झाले माहिती आहे ना?”
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण’, ‘त्याची काय अवस्था झाली तुला माहितीये ना’, ‘तुला पण त्याला भेटायला वर जायचं आहे का?’, अशी खालच्या दर्जाची भाषा संजय गायकवाड यांनी वापरली. प्रशांत आंबी यांनी संजय गायकवाडांना हे पुस्तक किमान वाचा, अशी विनंतीही करुन पाहिली. मात्र, ‘मला हे पुस्तक वाचायची गरज नाही, तू हे पुस्तक छापायचं बंद कर नाहीतर मी तुला घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन, तुझी जीभ कापेन’, अशी भाषा संजय गायकवाड यांनी वापरली होती.
आमदार संजय गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया
वादावर स्पष्टीकरण देताना गायकवाड म्हणाले, “ती ऑडिओ क्लिप मोडून-तोडून व्हायरल केली जात आहे. पण, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्या पुस्तकात महाराजांचा एकेरी उल्लेख असून अनेक आक्षेपार्ह प्रश्न उपस्थित केले आहेत. समोरचा व्यक्ती वारंवार डिवचत असल्याने मी त्याला शिव्या हासडल्या.”














Discussion about this post