मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर विविध वैद्यकीय तपासण्या सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, नियमित तपासणी आणि वैद्यकीय चाचण्यांसाठी शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती स्पष्ट होईल. यामुळे त्यांचा नियोजित बारामती दौरा रद्द करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीही शरद पवार यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा मुंबईत तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या सोबत पत्नी प्रतिभा पवार आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, आज बारामतीत सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. माध्यमांशी संवाद साधताना सुळेंनी “माझा भाऊ गेलाय, ही गोष्ट अजूनही मनाला पटत नाही. अनेक प्रश्न आजही मनात आहेत. तरीही नातेसंबंधांमध्ये कधीच राजकारण येऊ दिले नाही. आज जड अंतःकरणाने बारामतीला जात आहे,” असे म्हणत अजित दादांची आठवण काढली.














Discussion about this post