पुणे । राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यातील वाहनांना भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे आयोजित राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनासाठी जात असताना हा अपघात घडला. ताफ्यातील चार वाहनांनी एकमेकांना धडक दिल्याने चारही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, या अपघातात कुणीही गंभीर जखमी झाले नसून सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, छगन भुजबळ ज्या वाहनातून प्रवास करत होते, त्या गाडीला सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री छगन भुजबळ आज ओतूर दौऱ्यावर आहेत. जुन्नर तालुक्यात राज्यव्यापी सत्यशोधक समाजाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले असून, या कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला. अचानक झालेल्या या धडकेमुळे काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. चारही वाहनांचे नुकसान झाले असले तरी मोठी जीवितहानी टळल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या अधिवेशनाला मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातून विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि कार्यकर्ते या अधिवेशनासाठी ओतूरमध्ये दाखल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या थंडावलेली असताना हे तीनही नेते एकाच मंचावर येणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे.















Discussion about this post