जळगाव । सोशल मीडियावरील बनावट ओळख, भेटण्याचे आमिष आणि त्यानंतर थेट जीवघेणा हल्ला! वरणगाव येथे घडलेल्या या थरारक घटनेचा शेवट तरुणाच्या मृत्यूने झाला आहे. इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाने बनावट आयडी तयार करून मुक्ताईनगर येथील २४ वर्षीय सरफराज सैयद याला निर्जनस्थळी बोलावण्यात आले. तेथे त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करत गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडण्यात आल्या. गंभीर जखमी सरफराजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी भुसावळ तालुक्यातील दोघांना अटक केली आहे.
मृत सरफराज सैयद साकिर सैयद हा मुक्ताईनगरमधील काजीपुरा परिसरातील रहिवासी होता. तो कुटुंबातील मुख्य कमावता सदस्य असल्याने त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता सरफराजला इन्स्टाग्रामवर एका तरुणीच्या नावाने तयार केलेल्या बनावट आयडीवरून वारंवार मेसेज आणि कॉल करण्यात आले. गप्पा मारण्याच्या बहाण्याने त्याला वरणगाव येथील फुलगाव उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर बोलावण्यात आले. ओळखीच्या आमिषाला बळी पडून सरफराज तेथे पोहोचला.
सरफराज ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. आरोपींनी लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर आणि पायावर वार केले. सरफराज खाली कोसळल्यानंतर एका आरोपीने गावठी कट्टा काढून त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले.
काही दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरफराजला तातडीने जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही दिवस उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाच्या मृत्यूने नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.
दोघा आरोपींना अटक
घटनेनंतर वरणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील भूषण उर्फ बिस्ला राजू सावले (वय २०) आणि सिद्धार्थ रामदास ढिवरे (वय २७) या दोघांना अटक केली आहे. सोशल मीडियावरील बनावट प्रोफाईलचा वापर करून घडवून आणलेल्या या हल्ल्यामागील कारणांचा तपास पोलीस करत आहेत.














Discussion about this post