पाचोरा : सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कन्नड येथील डॉक्टरचा अखेर खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा परिसरात जमीन खरेदीच्या व्यवहारातून झालेल्या वादात डॉ. संजय मनोहर तेली (५२) यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. सोमवारी सकाळी बहुळा धरणात त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
डॉ. संजय तेली हे कन्नड येथे वैद्यकीय व्यवसाय करत होते. यासोबतच ते जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहारही करत असल्याची माहिती आहे. गोराडखेडा येथील राहुल धर्मराज पाटील याच्या दोन एकर जमिनीचा व्यवहार १ कोटी २ लाख ५० हजार रुपयांना ठरला होता. या व्यवहारासाठी डॉ. तेली यांनी राहुल पाटील याला तब्बल ८० लाख रुपये बयाणा दिला होता.
दि. १७ नोव्हेंबर रोजी डॉ. तेली हे आपल्या मुलीसोबत चारचाकीने कन्नडहून निघाले होते. जळगाव येथील गोदावरी मेडिकल कॉलेजमध्ये मुलीला सोडल्यानंतर ते पिंपळगाव हरेश्वर येथे शालकाकडून ५ लाख रुपये घेण्यासाठी गेले. त्यानंतर सांगवी (प्र. लोद) येथील घरी जाऊन ३ लाख १० हजार रुपये ठेवले आणि उर्वरित १ लाख ९० हजार रुपये घेऊन ते गोराडखेडा येथे गेले.
याठिकाणी जमीन व्यवहारावरून डॉ. तेली आणि राहुल पाटील यांच्यात वाद झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या वादातून राहुल पाटील याने डॉ. तेली यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने आपल्या सालदाराची मदत घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोघांनी मृतदेह पोत्यात भरून बहुळा धरणात फेकून दिल्याचे समोर आले. दरम्यान, १८ नोव्हेंबरपासून डॉ. तेली बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी पाचोरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी १ लाख २१ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.
तपासादरम्यान पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले. स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाल्याचे समोर आले. संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री बहुळा धरण परिसरात मृतदेहाचा शोध घेण्यात आला. अखेर सकाळी सुमारे ७ वाजता डॉ. संजय तेली यांचा मृतदेह बहुळा धरणात आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आरसीपी प्लाटूनसह पाचोरा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
या प्रकरणात पाचोरा पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, हत्येचे नेमके कारण, जमीन व्यवहारातील वादाची पार्श्वभूमी आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे.














Discussion about this post