मुंबई । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत नेते अजित पवार यांना विधानसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोकप्रस्तावानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भावनिक भाषण करत दादांवरील सर्व आरोपांचे “गाठोडे समुद्रात नेऊन बुडवावे” अशी मागणी केली. “दादा आता आपल्यात नाहीत. त्यांच्यावर झालेले आरोप आणि डाग आता कायमचे पुसले गेले पाहिजेत; तीच खरी आदरांजली ठरेल,” असे ते म्हणाले.
रोहित पवार म्हणाले, “दादा सभागृहात पहिला येणारा आणि शेवटी जाणारा नेता होते. चूक केली तर कान पकडायचे, चांगले काम केले तर पाठ थोपटायचे. बेकायदेशीर काम घेऊन येणाऱ्यांवर त्यांना राग यायचा.” त्यांनी पुढे सांगितले की, अनेक आरोप झाले तरी एकही सिद्ध झाला नाही. त्यामुळे आता त्या सर्व चर्चा थांबवून त्यांच्या कार्याची आठवण ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
वैयक्तिक आठवणींना उजाळा
“माझे लग्नही दादांनीच ठरवले होते,” अशी आठवण सांगत त्यांनी गेल्या काही महिन्यांत झालेल्या बैठकींचा उल्लेख केला. प्रशासनावर वचक असणारा नेता, लोकनेता, रांगडेपणा आणि राजकारणातील मिश्किलपणा गेला, अशा शब्दांत त्यांनी हळहळ व्यक्त केली.
तसेच काकी म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी कायम उभा राहील, असे आश्वासनही रोहित पवार यांनी दिले.सभागृहातील वातावरण काही काळ स्तब्ध झाले होते. दादांच्या आठवणींनी भारावलेल्या या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भावनिक क्षण पाहायला मिळाले.















Discussion about this post