राजस्थानच्या धौलपूरमध्ये स्लीपर कोच बस आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ११ जण ठार झाल्याची घटना घडलीय. मृतांमध्ये पाच मुले, तीन मुली, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या अपघातात काही जण जखमीही झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
समोर आलेल्या माहितीनुसार, बारी शहरातील गुमट मोहल्ला येथील रहिवासी असलेला टेम्पो बरौली गावात भट कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास NH 11B वर सुनीपूर गावाजवळ टेम्पो आणि ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. भरधाव बसने प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ११ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले.
तसेच टेम्पोच्या मागे बसलेले लोकही वाहनात अडकले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. ये-जा करणाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी टेम्पोतून मृतदेह बाहेर काढले. त्याचवेळी जखमींना धौलपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघाताची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी दुर्गा प्रसाद मीना, मंडळ अधिकारी महेंद्रकुमार मीना, बारी पोलिस स्टेशनचे स्टेशन इन्चार्ज विनोद कुमार यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली. या अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी परिस्थिती हाताळून जाम हटवला. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघाताची माहिती रस्त्यावरून जाणाऱ्यांकडून घेण्यात आली आहे.