मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबई आणि नवी मुंबई येथील दवाखान्यांसाठी कंत्राटी तत्त्वावर २२ फार्मासिस्ट पदांची भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना तासाला ६०० रुपये मानधन दिले जाणार आहे. दररोज पाच तास काम केल्यास तीन हजार रुपयांपर्यंत मानधन मिळू शकते. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. यासोबतच मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसीमधील डिप्लोमा किंवा पदवी अथवा बी. फार्मा पदवी असणे गरजेचे आहे. उमेदवारांची फार्मसी कायदा, १९४८ अंतर्गत नोंदणी झालेली असावी. तसेच महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलमध्ये नोंदणी आणि फार्मासिस्ट म्हणून किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे. सरकारी बँका किंवा सरकारी संस्थांमध्ये कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
तासाला ६०० रुपये मानधन
निवड झालेल्या उमेदवारांना तासाच्या आधारावर ६०० रुपये मानधन दिले जाईल. दररोज पाच तास काम केल्यास तीन हजार रुपयांपर्यंत मानधन मिळू शकते. या पदासाठी कोणतेही अतिरिक्त भत्ते दिले जाणार नाहीत. ही नियुक्ती एका वेळी जास्तीत जास्त २४० दिवसांच्या कंत्राटी कालावधीसाठी असेल. बँकेच्या गरजेनुसार उमेदवारांना कामासाठी बोलावण्यात येईल.
या कंत्राटी नियुक्तीमुळे उमेदवाराला भारतीय रिझर्व्ह बँकेत कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या नोकरीचा हक्क प्राप्त होणार नाही, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता, निवासस्थानापासून बँकेच्या संबंधित दवाखान्यापर्यंतचे अंतर आणि कामाचा अनुभव या निकषांवर केली जाणार आहे. सरकारी संस्था किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेत काम केलेल्या उमेदवारांच्या अनुभवाचाही विचार केला जाईल. प्राथमिक निवडीनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
अर्ज कुठे आणि कसा करावा?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा नसून, उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. अर्ज अधिसूचनेतील परिशिष्ट-१ मध्ये दिलेल्या विहित नमुन्यातच भरावा. अर्ज बंद लिफाफ्यात सादर करून त्यावर “मुंबई येथे निश्चित ताशी मानधनासह कंत्राटी तत्त्वावर फार्मासिस्ट पदासाठी अर्ज” असा मजकूर ठळकपणे लिहिणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
प्रादेशिक संचालक,
मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भरती विभाग,
भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई प्रादेशिक कार्यालय,
शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१.
अर्ज करण्याची अंतिम मुदत : ३ नोव्हेंबर २०२६, सायंकाळी ५ वाजेपर्यंत.















Discussion about this post