जळगाव । राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसतानाच, जळगाव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ३४ वर्षीय मावसाने आपल्याच १६ वर्षीय अल्पवयीन भाचीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष कृत्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, पोलिसांनी नराधम मावसाला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अत्याचाराचा सिलसिला सन २०२५ मधील दिवाळी सणाच्या १५ दिवस आधी सुरू झाला होता. पीडित मुलगी घरात एकटी असताना नराधम मावसाने तिच्यावर जबरदस्ती केली. या कृत्यानंतर “कोणाला काही सांगितले तर जीवे ठार मारीन,” अशी धमकी दिल्याने भीतीपोटी मुलीने मौन पाळले. याच दहशतीचा फायदा घेत नराधमाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.
वैद्यकीय तपासणीत फुटले गुपित
अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. तिची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचे समोर येताच रुग्णालयाने पोलीस प्रशासनाला पाचारण केले.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी पीडितेचा जबाब नोंदवला असता, तिने आपल्यासोबत घडलेला सर्व भीषण प्रकार कथन केला. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ हालचाली करत नराधम मावसाविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहेत. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीनेच अशा प्रकारे पाशवी कृत्य केल्याने संपूर्ण जळगाव तालुक्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.















Discussion about this post