मुंबई | राम मंदिरातील कथित देणगी अपहाराच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकार, भाजप आणि संघ परिवारावर जोरदार टीका केली. मनसेच्या रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी राम मंदिरातील देणगीच्या गैरव्यवहारावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे धर्माचा अपमान नसल्याचे स्पष्ट केले.
राज ठाकरे म्हणाले की, राम मंदिरात देणगीच्या पैशांचा अपहार झाला असल्याच्या बातम्या समोर येत असताना त्यावर प्रश्न विचारले तर उलट टीका केली जाते. “राम मंदिरात चोरी होत असेल, तर त्यावर काहीच बोलायचं नाही का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
मिसिंग लिंक प्रकल्पाच्या मुद्द्याचाही उल्लेख करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला. “मिसिंग लिंकबाबत प्रश्न विचारला तर महाराष्ट्राचा अपमान म्हणता, तर राम मंदिरातील कथित अपहारावर बोललं तर धर्माचा अपमान म्हणता. जनतेला प्रश्न विचारण्याचाही अधिकार नाही का?” असा सवाल त्यांनी केला.
राम मंदिराबाबत आपलीही आस्था असल्याचे सांगत, “मंदिरातील देणगीचा अपहार झाला असेल तर त्याची चौकशी व्हायलाच हवी. हा धर्माचा नव्हे, तर पारदर्शकतेचा प्रश्न आहे,” असे ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी पुढे आरोप केला की, राम मंदिर ट्रस्टमधील बहुसंख्य विश्वस्तांची नियुक्ती केंद्र सरकारकडून करण्यात आली असून, या प्रकरणात सत्य समोर यायला हवे. कथित अपहाराच्या रकमेबाबतही विविध आकडे समोर येत असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
याचवेळी त्यांनी विरोधकांच्या काळात अशी घटना घडली असती तर भाजप, संघ आणि विश्व हिंदू परिषद यांनी तीव्र आंदोलन केले असते, असा दावा करत सरकारवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला.















Discussion about this post