जळगाव : जिल्ह्यात ऑक्टोबर हिटचा जोर कायम असून, दिवसा उन्हाचा चटका आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर रात्री काहीशी बोचरी थंडी जाणवू लागली आहे. मात्र, आता हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली कमी दाबाची प्रणाली तीव्र होत असून, तिचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही २८ आणि २९ ऑक्टोबरदरम्यान हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष आता हवामानाच्या पुढील अंदाजाकडे लागले आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले असून, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने पुढे जात आहे. २८ ऑक्टोबरच्या सुमारास ही प्रणाली आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ पोहोचण्याचा अंदाज आहे. या प्रणालीमुळे पूर्व भारतातील काही भागांत मुसळधार पावसाचा धोका असून, महाराष्ट्रातील हवामानावरही तिचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
जळगावमध्ये पाऊस कधी पडणार?
जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत आहे. २६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. मात्र, बंगालच्या उपसागरातील प्रणालीच्या प्रभावामुळे पुढील काही दिवसांत हवामानात बदल होऊ शकतो. उपलब्ध अंदाजानुसार, २७ ऑक्टोबरला राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता असून, २८ आणि २९ ऑक्टोबरदरम्यान उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे .मात्र, जिल्ह्यात नेमका कोणत्या दिवशी आणि किती पाऊस पडेल, याबाबतचा निश्चित अंदाज अद्याप स्पष्ट नाही.
ऑक्टोबर हिटचा जोर कायम
एकीकडे पावसाचे संकेत मिळत असले, तरी सध्या राज्यातील अनेक भागांत उन्हाचा तडाखा कायम आहे. रविवारी अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. जळगावचे कमाल तापमान ३५.२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १५.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
शनिवारी जळगावचे किमान तापमान २०.५ अंश सेल्सिअस होते. रविवारी ते घसरून १५.५ अंशांवर आले. अवघ्या एका दिवसात किमान तापमानात ५ अंशांची घट झाल्याने रात्रीच्या थंडीत वाढ जाणवली. मात्र, दिवसा तापमान ३५ अंशांच्या पुढे असल्याने नागरिकांना उन्हाचा त्रासही सहन करावा लागत आहे.















Discussion about this post