जळगाव । राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी-अधिक होत असतानाच भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही भागांत ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी वाऱ्याचा वेग आणखी वाढून ७० ते ७५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. यासोबतच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि काही भागांत गारपीट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर, गोंदिया, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
जोरदार वाऱ्यामुळे मोठी झाडे उन्मळून पडण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट झाल्यास शेती पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पोषक वातावरण
राजस्थानमधील अनुपगढपासून दिल्ली, सिंध आणि पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच मध्य बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून सुमारे ३.१ किलोमीटर उंचीवरही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. विजांचा कडकडाट सुरू असताना शेतात, झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.














Discussion about this post