नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)च्या आंदोलनाने आता देशाच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सीजेपी ठाम असून, मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी पुन्हा स्पष्ट केली आहे. यानंतर जंतर-मंतरवर हजारो आंदोलक पुन्हा एकत्र जमले असून आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. गेल्या अनेक तासांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राहुल गांधी यांनी यावेळी संसदेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आणि आंदोलकांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या घटनेवर चर्चा होत नसल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार मौन बाळगत असल्यानेच ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
या आंदोलनाची दखल घेत केंद्र सरकारने केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले. आंदोलनस्थळी झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारसमोर पाच प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत निवेदन करावे तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, विरोधकांचे ठिय्या आंदोलन आणि केंद्र सरकारसोबत सुरू झालेला संवाद यामुळे राजधानीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून, सरकार या मागण्यांवर कोणती भूमिका घेते याकडे देशाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post