नवी दिल्ली । मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्तपासणीची (SIR) प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीवरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी नवी दिल्लीत जोरदार आंदोलन केले. आकाशवाणी भवन परिसरात तब्बल आठ ते नऊ तास सुरू असलेल्या या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

या कारवाईत जवळपास ५० खासदारांसह सुमारे २५० जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनस्थळी रात्रभर ठिय्या देण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी आंदोलकांना तेथून हटण्याची विनंती केली. मात्र नेते आंदोलनावर ठाम राहिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.

राहुल गांधी, प्रियंका गांधींची दोन तासांनी सुटका
ताब्यात घेतल्यानंतर सुमारे दोन तासांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची किंग्सवे कॅम्प येथून सुटका करण्यात आली. सुटकेनंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
“लोकशाहीच्या देशद्रोह्यांना वाचवण्यासाठी लोकशाहीचे उरलेसुरले अवशेषही चिखलात ओढले गेले आहेत. याचा हिशोब चुकता केला जाईल. एकाही देशद्रोहीला सोडलं जाणार नाही,” असा इशारा राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमधून दिला.
विरोधकांची नेमकी मागणी काय?
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवावे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदार याद्यांची सुरू असलेली विशेष सखोल पुनर्तपासणी (SIR) प्रक्रिया रद्द करावी, अशीही मागणी आहे.या मागण्यांसाठी इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी हा मोर्चा रोखल्यानंतर आकाशवाणी भवन परिसरात विरोधी नेत्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.















Discussion about this post