नवी दिल्ली : देशातील पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याच्या E-20 धोरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या धोरणावरून केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले असून, पेट्रोलमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक इथेनॉल मिसळले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. कर्नाटकातील पेट्रोलच्या नमुन्यांच्या लॅब रिपोर्टचा दाखला देत त्यांनी सरकारला थेट सवाल उपस्थित केले आहेत. या आरोपांमुळे E-20 पेट्रोलचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
‘E-20 नव्हे, 420 इंधन’; राहुल गांधींचा आरोप
केंद्र सरकारच्या E-20 धोरणानुसार पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोल मिसळण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, प्रत्यक्षात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. सोशल मीडियावरील पोस्टमधून त्यांनी या इंधनाला ‘E-20 नव्हे तर 420 इंधन’ असे संबोधत सरकारवर टीका केली. सामान्य नागरिकांच्या वाहनांमध्ये सरकारच पेट्रोलची चोरी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमधून घेण्यात आलेल्या पेट्रोलच्या नमुन्यांच्या अहवालाचा आधार घेतला आहे. काँग्रेसच्या दाव्यानुसार, तपासणी करण्यात आलेल्या १४ नमुन्यांपैकी ११ नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक आढळले आहे. काही नमुन्यांमध्ये हे प्रमाण ३० टक्क्यांहून अधिक असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
या नमुन्यांमध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, नायरा आणि शेल यांसारख्या कंपन्यांच्या पेट्रोलचा समावेश असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. या अहवालाच्या आधारे तेल कंपन्यांच्या इंधन गुणवत्तेवर आणि सरकारी नियंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पडताळणी आणि संबंधित कंपन्यांची बाजू समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल
या प्रकरणावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही थेट प्रश्न विचारले आहेत. देशभरात पुरवठा होणाऱ्या पेट्रोलमधील इथेनॉलच्या प्रत्यक्ष प्रमाणावर सरकारचे किती नियंत्रण आहे? निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक इथेनॉल मिसळणाऱ्या तेल कंपन्यांवर सरकार कधी आणि काय कारवाई करणार? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
एकीकडे E-20 पेट्रोलच्या वापरावरून वाहनचालकांच्या तक्रारी, तर दुसरीकडे पेट्रोलच्या नमुन्यांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक इथेनॉल असल्याचा राहुल गांधी यांचा दावा, यामुळे या धोरणावर नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता केंद्र सरकार आणि संबंधित तेल कंपन्या या आरोपांवर काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post