मुंबई । दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून उद्या, ८ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाचा सण आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये मिठाई, फराळ आणि गोड पदार्थांच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. मात्र, सणाचा आनंद साजरा करताना भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाच्या मिठाईमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. FDA चे आक्रमक अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विशेष व्हिडिओ जारी करत नागरिकांना मिठाई खरेदी करताना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
“सुरक्षित अन्न हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, तो कोणतीही सणापुरती भेटवस्तू नाही,” असे स्पष्ट करत सार्वजनिक आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मिठाई खरेदी करताना या गोष्टी तपासा
मिठाई खरेदी करताना पॅकेटवरील उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट आणि ‘बेस्ट बिफोर’ तारीख आवर्जून तपासावी. ज्या दुकानातून मिठाई खरेदी करत आहात, त्या दुकानाकडे FDA चा वैध परवाना आहे की नाही, याची खात्री करावी. तसेच खरेदीच्या बिलावर FSSAI परवाना क्रमांक छापलेला असल्याची तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गरजेपुरतीच मिठाई खरेदी करून ती शक्यतो दोन ते तीन दिवसांत संपवावी. मिठाई फ्रीजमध्ये ठेवली तरी तिचा दर्जा कायम राहीलच असे नाही. मिठाई तयार करताना उत्पादकांनी नैसर्गिक रंगांचाच वापर करावा. गिफ्ट पॅकमधील इतर खाद्यवस्तूंचाही दर्जा योग्य असणे आवश्यक आहे. निकृष्ट दर्जाच्या वस्तू आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
ऑनलाइन मिठाई मागवताना विशेष काळजी घ्या
सध्या ऑनलाइन मिठाई मागवण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी पार्सल मिळाल्यानंतर पॅकेटची स्थिती, एक्सपायरी डेट आणि ब्रँडची खात्री केल्याशिवाय ते स्वीकारू नये. पॅकेट खराब असल्यास किंवा त्यावरील माहिती संशयास्पद वाटल्यास संबंधित उत्पादनाबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भेसळयुक्त मिठाई आढळल्यास येथे करा तक्रार
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही भेसळयुक्त, निकृष्ट किंवा खराब दर्जाची मिठाई आढळल्यास नागरिकांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी. यासाठी प्रशासनाने Complaints.mahafda.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. तसेच १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधूनही तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रकरणाची दखल घेऊन नियमानुसार कारवाई केली जाईल.
दिवाळीच्या सणात मिठाई खरेदी करताना केवळ चव आणि किंमत न पाहता तिचा दर्जा, उत्पादनाची तारीख आणि सुरक्षितता तपासणे महत्त्वाचे आहे. ग्राहकांनी सतर्क राहावे आणि मिठाई उत्पादक व दुकानदारांनीही अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.














Discussion about this post