नंदुरबार : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने महिला व बालविकास मंत्री मा. आदिती तटकरे यांना निवेदन देण्यात आले. समितीचे निमंत्रक युवराज बैसाणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नंदुरबार येथे मंत्र्यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी धडगाव-अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी उपस्थित होते.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आर्थिक आणि सेवाविषयक प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधताना, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ग्रॅच्युइटी देण्यात यावी, तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी तातडीने पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली. गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांना दरमहा २४ हजार ८०० रुपये, तर मदतनीसांना २० हजार ४०० रुपये मानधन लागू करावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षांऐवजी ६५ वर्षे करण्यात यावे, प्रोत्साहन भत्ता कामावर आधारित न देता तो नियमित मानधनासोबत जोडण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना दिला जाणारा निकृष्ट दर्जाचा टीएचआर बंद करून त्याऐवजी गरम व ताजा पूरक पोषण आहार देण्यात यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
एफआरएस प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर करून अंगणवाडी सेविकांना दैनंदिन कामकाजात होणारा त्रास थांबवावा, दरवर्षी मिळणारी १५ दिवसांची उन्हाळी सुट्टी वाढवून एक महिन्याची करावी, तसेच आजारपणासाठी भरपगारी रजा मंजूर करावी, अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील एसआयआर, बीएलओ तसेच इतर योजनाबाह्य कामे देण्यात येऊ नयेत, अशी भूमिका मांडण्यात आली.
या मागण्यांसह इतर प्रलंबित प्रश्नांबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच सहाय्यक आयुक्त क्षीरसागर आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनाही निवेदन देऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या शिष्टमंडळात समितीचे निमंत्रक युवराज बैसाणे, दिलकोरताई गिरासे, राजू पाटील, अमोल बैसाणे, वकील पाटील आणि समाधान बोरसे यांचा समावेश होता.















Discussion about this post