मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) एनडीए (NDA) मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यातच मंगळवारी रात्री माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर या चर्चांना प्रचंड उधाण आले होते. या सर्व चर्चांवर आणि राजकीय भूकंपाच्या शक्यतांवर अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आणि सर्व वावड्यांचे जाहीर खंडन केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र पक्षातील कोणत्याही प्रमुख नेत्याने अशी भूमिका जाहीर केलेली नाही. या सर्व चर्चा केवळ सूत्रांच्या हवाली केल्या जात असून त्यात कोणतेही तथ्य नाही.”
त्या पुढे म्हणाल्या की, या विषयावर आपण संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ आणि बंटी पाटील यांच्याशीही दूरध्वनीवर चर्चा केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात एनडीएसोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.
डिलिमिटेशन विधेयकावरही भूमिका स्पष्ट
यावेळी सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघ पुनर्रचना विषयावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असून त्याबाबत कोणतीही शंका नाही. या संदर्भात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी आयोजित केलेल्या बैठकीत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, खासदार असदुद्दीन ओवेसी, तसेच आपण स्वतः उपस्थित होतो. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. या बैठकीत देशभरात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यांसाठी समान नियम लागू केले जातील आणि कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देण्यात आल्याचे सुळे यांनी सांगितले.
प्रस्ताव आल्यानंतर भूमिका जाहीर करणार
डिलिमिटेशनबाबतचा अधिकृत प्रस्ताव समोर आल्यानंतर पक्ष त्याचा सविस्तर अभ्यास करेल. त्यानंतर २४ तासांच्या आत राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येईल, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.















Discussion about this post