जळगाव : नशिराबाद येथे बुधवारी रात्री पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून दोन अज्ञात दरोडेखोरांनी दहशत निर्माण केली. एका दरोडेखोराने बंदुकीचा धाक दाखवला, तर दुसऱ्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या गळ्याला सुरी लावून घरातील दागिने आणि रोकड देण्याची मागणी केली. मात्र, संकटाची चाहूल लागताच पोलीस नाईक गणेश कोळी यांनी प्रसंगावधान राखत स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले आणि डायल ११२ वर संपर्क साधला. पोलिसांना माहिती मिळाल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी कारची चावी घेऊन तेथून पळ काढला. पाठलाग सुरू झाल्यानंतर त्यांनी मन्यारखेडा शिवारात कार सोडून अंधाराचा फायदा घेत पोबारा केला.
नशिराबाद येथील भादली रस्त्यावरील मुक्तेश्वरनगर परिसरात पोलीस नाईक गणेश साहेबराव कोळी यांचे घर आहे. कोळी हे ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील विष्णूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. नातेवाइकाच्या निधनामुळे ते अंत्यसंस्कारासाठी नशिराबाद येथे आले होते. बुधवारी रात्री ते कुटुंबीयांसोबत घरी असताना साडेआठच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी अचानक घरात प्रवेश केला.
घरात शिरताच दोघांनी कुटुंबीयांना धमकावण्यास सुरुवात केली. एका दरोडेखोराने कोळी यांच्या पत्नीच्या गळ्याला सुरी लावली, तर दुसऱ्याने बंदुकीसदृश शस्त्र ताणून धरत घरातील सोने व रोकड काढून देण्यास सांगितले. अचानक समोर आलेल्या शस्त्रांमुळे घरातील सर्वजण घाबरले.
दरम्यान, कोळी यांच्या अंगावर दागिने असल्याचे दरोडेखोरांच्या लक्षात आले. परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता ओळखून कोळी यांनी कोणताही प्रतिकार केला नाही. संधी साधत त्यांनी स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले. त्यानंतर तेथूनच डायल ११२ वर फोन करून घरात सशस्त्र दरोडेखोर शिरल्याची माहिती पोलिसांना दिली.
फोनवरून पोलिसांशी संपर्क सुरू असल्याचे दरोडेखोरांच्या लक्षात आले. त्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा मजबूत असल्याने त्यांना तो तोडता आला नाही. त्याचवेळी पोलिसांना माहिती मिळाल्याची चाहूल लागल्याने दोघांनी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
घरातून बाहेर पडताना त्यांच्या हाती कोळी यांच्या कारची चावी लागली. दोघांनी चावी घेतली आणि कारमधून भादली रस्त्याच्या दिशेने वेगाने निघून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.
पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर दरोडेखोरांनी मन्यारखेडा शिवारात कार सोडली. अंधाराचा फायदा घेत दोघेही शेतातून फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कार ताब्यात घेतली असून, आता कारच्या आधारे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे नशिराबाद परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शस्त्रांचा धाक दाखवून घरातील कुटुंबीयांना धमकावणाऱ्या या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. दरम्यान, गणेश कोळी यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे दिसून येत आहे.















Discussion about this post