पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला पुणे विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे राज्यभरात गाजलेल्या या प्रकरणावर न्यायालयाने कठोर निर्णय दिला आहे.
या प्रकरणातील गुन्हा 1 मे 2026 रोजी घडला होता. आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने चिमुकलीला सोबत नेले, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला होता.
घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. त्यामध्ये आरोपी भीमराव कांबळे चिमुकलीला हात धरून घेऊन जाताना स्पष्ट दिसत होता. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली होती. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुलीही दिली होती. विशेष म्हणजे, त्याच्या कुटुंबीयांनीही त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.
न्यायालयाने यापूर्वी आरोपीला दोषी ठरवले होते. शिक्षेबाबतचा निर्णय 29 जूनसाठी राखून ठेवण्यात आला होता. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, सादर झालेले पुरावे आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला मृत्यूदंड (फाशीची शिक्षा) सुनावला.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि अमानुष असल्याचे नमूद करत, समाजात अशा गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी कठोर शिक्षा आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवले. आरोपीविरुद्ध सबळ पुरावे असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. विविध संघटनांनी मोर्चे काढत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. चिमुकलीच्या कुटुंबीयांनीही न्यायालयात आरोपीला मृत्यूदंड देण्याची मागणी केली होती. निकालाच्या दिवशी न्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, राज्यभरातून या निकालाचे स्वागत केले जात आहे.















Discussion about this post