जळगाव : शेतातील वादातून संताप अनावर झाल्याने एका व्यक्तीने थेट फावड्याने हल्ला करत दुसऱ्याचा जीव घेतल्याची खळबळजनक घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली शिवारात घडली. सोमवारी दुपारी नेव्हरे शिवारात घडलेल्या या घटनेत गोरख विठ्ठल ठाकूर (वय ४८, रा. अंतुर्ली) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील संशयित मुकुंदा प्रल्हाद पाटील (वय ५५) हा हल्ल्यानंतर पसार झाला असून, त्याच्या शोधासाठी एमआयडीसी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
शिरसोली येथील नेव्हरे शिवारात ज्ञानेश्वर राजाराम ठाकूर यांची शेती आहे. ते शेतातील झोपडीत वास्तव्यास असून, दिवाळीच्या कामासाठी मदत व्हावी म्हणून त्यांचे चुलत भाऊ गोरख ठाकूर तीन दिवसांपूर्वी अंतुर्ली येथून आले होते. शेतातील कामाच्या निमित्ताने त्यांची संशयित मुकुंदा पाटील याच्याशी भेट होत असे.
सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास दोघेही शेतात समोरासमोर आले. यावेळी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. शाब्दिक वाद वाढत गेल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. त्यातून संतापलेल्या मुकुंदा पाटील याने जवळील फावड्याने गोरख ठाकूर यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात ठाकूर गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने शेतात दाखल झाले. जखमी गोरख ठाकूर यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. शेतातील किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेने शिरसोलीसह परिसरात खळबळ उडाली आहे.
गोरख ठाकूर यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. कामानिमित्त त्यांची पत्नी आणि मुलगा पुण्यात वास्तव्यास आहेत. दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर नातेवाईकांना मदत करण्यासाठी आलेल्या गोरख यांच्यावर काळाने घाला घातल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, घटनेनंतर संशयित मुकुंदा पाटील घटनास्थळावरून पसार झाला. त्याला शोधण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपीचा शोध सुरू असून, या घटनेमागील नेमके कारण पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.














Discussion about this post