जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी आकाराऊत गावाजवळ मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रक पलटी झाल्यानंतर त्याला अचानक आग लागल्याने एकाचा होरपळून मृत्यू झाला, तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळहून मलकापूरकडे पशुखाद्य घेऊन जाणारा ट्रक मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास पिंपरी आकाराऊत गावाजवळून जात होता. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यावर पलटी झाला. अपघातानंतर काही क्षणांतच ट्रकने पेट घेतला आणि काही वेळात संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या भीषण आगीत ट्रकमधील एका व्यक्तीचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, बचाव पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. सकाळपर्यंत जळालेल्या ट्रकमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, अपघातग्रस्त ट्रक नेमका कोणता माल घेऊन जात होता तसेच मृत आणि जखमी व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेमुळे मुक्ताईनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून रात्रीच्या वेळी वाढणाऱ्या अपघातांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाने रस्ते सुरक्षेबाबत अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.















Discussion about this post