जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ संदर्भात महत्त्वपूर्ण शुद्धीपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे परीक्षेसाठी अर्ज केलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारांना कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क न भरता आपल्या अर्जातील शैक्षणिक माहिती आणि आरक्षणासंदर्भातील दावे अद्ययावत करण्याची संधी देण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत विविध संवर्गांतील एकूण १६ हजार ७१७ रिक्त पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, काही पदांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आयोगाने हे शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे अर्ज करताना शैक्षणिक अर्हतेची माहिती भरण्यात चूक झालेल्या किंवा माहितीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
अशी करा शैक्षणिक माहिती अपडेट
इच्छुक उमेदवारांनी MPSC च्या mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर प्रोफाइल विभागात जाऊन आवश्यक शैक्षणिक माहिती आणि आरक्षणाचे दावे अद्ययावत करावेत. माहितीमध्ये बदल केल्यानंतर प्रोफाइल पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे.
त्यानंतर ‘माय अकाउंट’मधील ‘क्वालिफिकेशन अपडेट’ हा पर्याय निवडून आवश्यक बदल करावेत. त्यानंतर ‘रिचेक एलिजिबिलिटी’ या पर्यायावर क्लिक करून आपली पात्रता पुन्हा तपासता येणार आहे.
२७ नोव्हेंबरपर्यंत मुदत
या प्रक्रियेसाठी उमेदवारांना आपला मूळ अर्ज रद्द करण्याची आवश्यकता नाही. तसेच कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. उमेदवारांनी २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.
आयोगाच्या या निर्णयामुळे तांत्रिक अडचणी आणि शैक्षणिक पात्रतेबाबत संभ्रम असलेल्या उमेदवारांना आपली माहिती दुरुस्त करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत प्रोफाइल अद्ययावत करून पात्रता तपासून घ्यावी.















Discussion about this post