मुंबई । ठाकरे गटातून फुटून बाहेर पडलेले खासदार संजय दीना पाटील वादात सापडले आहेत. पत्रकारांशी बोलताना संजय पाटील यांचा संयम सुटला आणि त्यांनी उपस्थित पत्रकारांना थेट धमकावत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रागाच्या भरात त्यांनी पत्रकारांना मारण्याची भाषा केल्यामुळे माध्यम जगतातून यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
“मी खासदार आहे हे विसरून जाईन… यापुढे जर माझ्याकडे आलात तर मार खाणार!” अशा शब्दांत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धमकी दिल्याचा आरोप होत असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावरून खासदार संजय दिना पाटील संतप्त झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांना कॅमेरा आणि माईक बंद करण्यास सांगत अर्वाच्य भाषेत दमदाटी केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत घडल्याचे सांगितले जात असून तो कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.
वाद वाढत असताना खासदारांनी “मी कोणाला घाबरत नाही, हवे तर कमिशनरकडे तक्रार करा” असे म्हणत पत्रकारांवर संताप व्यक्त केला. तसेच “खूप दिवस सहन केलं, आता उगाच डोक्यात जाऊ नका” अशा शब्दांत त्यांनी इशाराही दिला.
“यापुढे आलात तर मार खाणार”
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये खासदार संजय पाटील म्हणताना दिसत आहेत की, “यापुढे माझ्याकडे आलात तर मार खाणार, हे लिहून घ्या आणि रेकॉर्ड करा.” तसेच पत्रकारांना पोलिसांकडे किंवा कमिशनरकडे तक्रार करण्याचे आव्हानही त्यांनी दिले. “तुम्हाला घराखाली उभं करतो, जेवायला देतो आणि तुम्ही थेट घरापर्यंत कॅमेरा घेऊन येता,” असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, व्हायरल व्हिडिओमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून विविध पत्रकार संघटनांकडूनही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.















Discussion about this post