अंतरवाली सराटी । मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता राजकीय आणि सामाजिक स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आज अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला असून, “हा महाराष्ट्र आहे, मनोज सरांना हात लावला तर महाराष्ट्र इथं येईल,” असा थेट आणि खणखणीत इशारा सरकारला दिला आहे.


सरकार निर्दयी, जरांगे स्वतःसाठी नाही तर मुलांच्या भविष्यासाठी बसलेत!
सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढत अभिजीत दिपके म्हणाले की, हे सरकार अतिशय निर्दयी झाले असून उपोषणावर बसलेल्या एका माणसाच्या प्रकृतीची त्यांना पर्वा नाही. “मनोज जरांगे हे स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे, तर समाजातील गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळावे आणि त्यांना रोजगार मिळावा यासाठी उपोषणाला बसले आहेत. जर सरकारने मुलांना आधीच चांगले शिक्षण व रोजगार दिला असता, तर आज ही वेळ आली नसती,” असे म्हणत त्यांनी सरकारचे हे स्पष्ट अपयश असल्याचे म्हटले.
प्रथमेश देशमुख यांच्या आत्महत्येवरून सरकारला जाब
नुकतेच आत्महत्या केलेल्या प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतल्याची आठवण काढत दिपके यांनी सरकारला धारेवर धरले. “अडीच लाखांच्या कर्जासाठी अवघ्या २७ वर्षांच्या तरुण मुलाने आत्महत्या केली. ग्रामीण भागातील मुलांची आर्थिक परिस्थिती बेताची असते, त्यांच्यासाठी चांगल्या शाळा नाहीत, त्यांना शिक्षणात अडचणी येतात. मग या मुलांनी करायचे काय? तुमचे स्वतःचे मूल शिकून परदेशात पाठवता, मग इथल्या ग्रामीण भागातील मुलांचे काय?” असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
“तुम्हालाही जरांगेना २६ दिवस उपाशी ठेवायचंय का?”
सरकारच्या दिरंगाईवर ताशेरे ओढताना दिपके यांनी सोनम वांगचूक यांच्या दिल्लीतील आंदोलनाचा दाखला दिला. जरांगे यांच्या उपोषणाला दिवस होत आले तरी सरकार दरबारी कोणीही ठोस चर्चा करण्यासाठी पुढे येत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “सोनम वांगचूक यांना जसे दिल्लीत २६ दिवस उपाशी ठेवले होते, तसेच तुम्हाला मनोज जरांगे यांच्या बाबतीत करायचे आहे का? इथ येऊन सरकारला बोलायला अडचण काय आहे? समाजासाठी झटणाऱ्यांसोबत सरकार बोलायला तयार नाही, पण कॉमेडियनला बोलावून त्याला बिस्कीट द्यायला तयार आहेत,” अशा शब्दांत त्यांनी राज्यकर्त्यांच्या भूमिकेवर उपरोधिक टीका केली.
अभिजीत दिपके यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि इशाऱ्यामुळे आता अंतरवाली सराटीतील जरांगे पाटलांच्या उपोषण आंदोलनाला आणखी धार येण्याची आणि राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.














Discussion about this post