मालेगाव | मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कंत्राटदारांची सुमारे २० लाख रुपयांची बिले मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप तिघांवर आहे. विशेष म्हणजे, आयुक्त रवींद्र जाधव हे ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होणार होते. निवृत्तीच्या अवघ्या दोन दिवस आधी झालेल्या या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.
या प्रकरणात महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, त्यांचे स्वीय सहायक नीलेश पाटील आणि अकाउंटंट हरीश डिंबर यांना अटक करण्यात आली आहे. कंत्राटदाराच्या कामांची बिले मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या आधारे विभागाने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गवत काढण्याचे काम आणि जलवाहिनीच्या कामाशी संबंधित कंत्राटदाराच्या बिलांबाबत लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. या दोन्ही कामांची सुमारे २० लाख रुपयांची बिले मंजूर करण्याच्या संदर्भात हे प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे.
तिघांना अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. आरोपींच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कारवाईतून आणखी काही महत्त्वाचे तपशील समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.
आयुक्त रवींद्र जाधव हे ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांना लाचप्रकरणात अटक झाल्याने मालेगाव महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे.














Discussion about this post