जामनेर : जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत शिवारातून चोरीला गेलेल्या बैलजोडीचा शोध घेण्यात पहूर पोलिसांना यश आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेत तपास केला. या प्रकरणात सूनसगाव येथील एका शेतातून चोरीची बैलजोडी हस्तगत करण्यात आली असून, चोरीसाठी वापरण्यात आलेला टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पिंपळगाव गोलाईत शिवारातील गट क्रमांक १०७ मधील शेतातून शेतकऱ्याची बैलजोडी चोरीला गेली होती. या बैलजोडीची किंमत अंदाजे १ लाख ५ हजार रुपये होती. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना पहूर पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार संजय पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील (दोघे रा. सोनाळा, ता. जामनेर) यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. या चौकशीतून बैलजोडी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.तपासादरम्यान पोलिसांनी सूनसगाव येथे जाऊन नरेंद्र गोखरे यांच्या शेतातून चोरीला गेलेली बैलजोडी हस्तगत केली. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेला टेम्पोही जप्त करण्यात आला. चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दीपक पाटील करीत आहेत.














Discussion about this post