मुंबई । राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला तातडीची आर्थिक मदत म्हणून ५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर काहीसा दिलासा मिळणार आहे.
दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार रक्कम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात यापूर्वी साधारणपणे नोव्हेंबरमध्ये दुष्काळ जाहीर केला जात होता आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना मदत दिली जात होती. मात्र, यंदा सरकारने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ऑक्टोबरमध्येच दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी यापूर्वीच शासन निर्णय काढण्यात आला असून, आता पूरक शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागांसाठी १२ योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
दिवाळी जवळ आली असताना शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याने त्यांना तातडीने मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला ५ हजार रुपये अग्रीम मदत म्हणून दिले जाणार आहेत. ही रक्कम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया तातडीने राबवली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
केंद्राच्या मदतीची वाट न पाहता तातडीचा दिलासा
दुष्काळासाठी केंद्र सरकारच्या नियमांनुसार काही प्रक्रिया, टप्पे आणि निर्धारित कालमर्यादा पूर्ण करावी लागते. त्यामुळे दिवाळीपूर्वी केंद्राकडून मदत मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होणे कठीण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मात्र, केंद्र सरकारकडून मदत प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना नियमानुसार देय असलेली मदत दिली जाणार आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात दिवाळीसाठी काही रक्कम असावी, या उद्देशाने राज्य सरकारने ५ हजार रुपयांची तातडीची मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्जमाफीची प्रक्रियाही सुरू
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून, नव्याने साडेतीन लाख शेतकऱ्यांची यादी प्रमाणित करण्यात आली आहे. या यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीचे काम थांबलेले नसून, त्याची अंमलबजावणी सुरूच आहे. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची तातडीची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.















Discussion about this post