जळगाव | ग्रंथालय संचालनालयाच्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत ५१ व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या १,१८३ ग्रंथांची यादी ग्रंथालय संचालनालयाच्या “www.dol.maharashtra.gov.in” या अधिकृत संकेतस्थळावर १६ ते ३१ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता आणि राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत सन २०२४ मध्ये प्रकाशित होऊन ग्रंथालय संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमितीच्या सदस्यांनी १,१८३ ग्रंथांची निवड केली आहे. यामध्ये मराठी भाषेतील ६८५, हिंदी भाषेतील २४६ आणि इंग्रजी भाषेतील २५२ ग्रंथांचा समावेश आहे.
या ग्रंथयादीतील ग्रंथांचे वितरण संचालनालयाच्या २५ टक्के ग्रंथसूट दरानुसार करणे बंधनकारक आहे. यादीतील ग्रंथांच्या नावांमध्ये, लेखकांच्या नावांमध्ये, प्रकाशकांच्या तपशिलात किंवा किमतीमध्ये काही बदल असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी सूचना, हरकती किंवा आक्षेप ३१ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत लेखी स्वरूपात सादर करावेत.
या सूचना व हरकती ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई – ४०० ००१ यांच्याकडे कार्यालयीन वेळेत हस्तबटवड्याने किंवा पोस्टाने अथवा संबंधित कार्यालयाने नमूद केलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवाव्यात. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या सूचना, हरकती किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही.
निवड झालेल्या ग्रंथांच्या यादीतील नाव, लेखक, प्रकाशक आणि किंमत यासंदर्भात काही बदल असल्यास ते निदर्शनास आणून द्यावेत, असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.















Discussion about this post