दिल्ली । दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान केलेल्या एका टिप्पणीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) चे सहसंयोजक आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने ‘तुम्ही जेन झी नाहीत’ अशी टिप्पणी केल्याचे वृत्त आहे. या दोघांनी न्यायालयीन कोठडी वाढवण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनेही लक्ष वेधले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्यास बंदी असताना आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी मैदानाच्या प्रवेशद्वारावरून आत जात घोषणाबाजी केली होती. या प्रकारानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या कोठडीत वाढ केल्यानंतर या निर्णयाविरोधात दोघांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
‘तुम्ही जेन झी नाहीत’, न्यायालयाची टिप्पणी
या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना त्यांच्या वयाबाबत विचारणा केली. दोघांनीही आपापले वय सांगितल्यानंतर न्यायालयाने ‘तुम्ही जेन झी नाहीत’ अशी टिप्पणी केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर दोघांनी आपली याचिका मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे.या टिप्पणीमुळे सुनावणीतील हा प्रसंग चर्चेचा विषय ठरला आहे. जेन झी म्हणजे साधारणपणे १९९७ ते २०१२ या काळात जन्मलेल्या पिढीला संबोधले जाते.
The only person who qualifies as a GenZ https://t.co/L70BGBegEG
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 21, 2026
अभिजीत दीपकेंची पोस्ट चर्चेत
या घडामोडीनंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरला आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या पहिल्या आंदोलनानंतर पंतप्रधान मोदी यांनी इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ पोस्ट करत जेन झी तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील एका व्हिडीओचा स्क्रीनशॉट दीपके यांनी आपल्या पोस्टमध्ये शेअर केला.
या फोटोसोबत त्यांनी ‘GenZ म्हणून पात्र ठरणारी एकमेव व्यक्ती’ असा आशय असलेले कॅप्शन दिले. न्यायालयाच्या ‘तुम्ही जेन झी नाहीत’ या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर दीपके यांच्या पोस्टकडे पाहिले जात आहे. त्यामुळे त्यांच्या पोस्टचीही सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.















Discussion about this post